0

भाषा आणि भारतीय मनोविज्ञान

मी केरळमधील एका विश्वविद्यालयात स्नातकोत्तर विद्यार्थ्यांस सञ्ज्ञात्मक-मनोविज्ञान शिकविते, आज मी भाषा या एका आकर्षक विषयावरती चर्चा करणार आहे.

आमच्या विद्यापीठामध्ये आम्ही संस्कृत आणि अन्य भारतीय भाषांवरती विशेष ध्यान देत असतो. याचे कारण असे की विचार, संस्कृती आणि मन यांच्या जडणघडणीसाठी भाषा ही मुख्य आहे. या मूळविचारावर चिन्मय-विश्विद्यापीठ आधारलेले आहे. प्रस्तुत विचार एका संस्कृतसुभाषितामध्ये ही व्यक्त केलेला आहे,- तो असा “संस्कृतिः संस्कृताश्रिता”. याचा अर्थ असा की संस्कृति ही (संस्कृत) भाषेवर आधारीत आहे. तर आमच्या विद्यापीठामध्ये विद्यार्थी संस्कृत भाषा आणि देवनागरी लिपी शिकतात. इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणांतून आलेले असल्यामुळे, बहुतांश विद्यार्थी याचा विरोध करतात आणि तक्रारही. ही एक वैश्विक समस्या आहे, की उच्च शिक्षणामध्ये इंग्रजी शिक्षणाच्या अनन्य उपयोगामुळे भारतात (भारतीय) भाषांच्या निधानास दुर्लक्षित केल्या जात आहे. परिणामी आपल्या भाषा आणि तत्स्थित अनुभूतीं लुप्त होत चालल्या आहेत.

माझ्या सञ्ज्ञात्मक-मनोविज्ञानच्या वर्गामध्ये आम्ही द्विभाषिकतेबद्दल शिकत होतो. द्विभाषावादाचा ऐतिहासिक सन्दर्भ असा आहे -, यूरोपियांचे वसाहतिकरण. वसाहतिकरणाच्य दरम्यान व नन्तर कित्येक वर्षें अत्यंत कमी रोजगारवरती काम करणार्या लोकांच्या लाटा या कृतवसाहतराष्ट्रांस रोजगाराच्या शोधार्थ येऊन थडकल्या. प्रायः चीनी, भारतीय बहुतांश आशिया तथा आफ्रिकेतील लोक हे यूरोप, उत्तर-अमेरिका व आफ्रिकेतील यूरोपिय वसाहतींत गेले. तेव्हा ते आपल्याबरोबर भाषा, भोजन आणि संस्कृती ही घेऊन गेले. हे अप्रवासी प्रायः बंद वस्त्यांमध्ये ठेवले जात. पाश्चिमात्य वसाहतवाद्यांमध्ये व या अप्रवासी भारतीयादि लोकांमध्ये सांस्कृतिक सम्बन्ध असा अत्यंत कमी अथवा नव्हताच.ओघाने यासन्दर्भात यूरो-अमेरिकनांच्या वाढत्या द्विभाषावादाच्या अनुसन्धानाविषयी रुचिमागे प्रमुख तीन घटना निर्दिष्ट केल्या जाऊ शकतात. प्रथम, या अप्रवासीयांच्या मुलांचे शाळांमधील प्रवेश आणि इंग्रजी शिक्षणाची आवशयकता अथवा देशामध्ये शिक्षणासाठी प्रादेशिकभाषेच्या शिक्षणाची आवश्यकता. द्वितीय, भाषाससंमिश्र परिवार आणि आणि घरातील द्विभाषिकतेचा वाढत्या मुलांवरती परिणाम, की यांच्याकडून भाषेचे उचितरीत्या सम्पादन होईल की नाही? आणि तृतीय, अशिक्षित व श्रमजीवी अप्रवासियांच्या येणार्य पिढ्यांचे शिक्षणामुळे अत्यन्त आश्चर्यकारक आणि सक्षम व सामाजिक परिवर्तन. विशेषतः भारतीयांमध्ये. थोडक्यात, या तीन कारणांमूळे द्विभाषावादामध्ये एक अत्यंत अनुसन्धानात्मक रुची उत्पन्न झाली. आपण साधारणपणे इतिहासात इ. स.१८०० ते इ. स. १९७० या काळाचा मागोवा घेतला. या दरम्यान पाश्चात्य आणि अमेरिकीय संशोधकांमध्ये भाषांविषयी रुची उत्पन्न झाली.

जर आपण पाहिले तर आपल्या ध्यानात येते की भारतीयांच्या संदर्भात तसेच आशिया व आफ्रिकेच्या बर्याच प्रांतांबाबतीत या चर्चेचे अत्यन्त वेगळे स्वरूप आढळते. कारण भारतीय सभ्यतेमध्ये आणि तदुपमहाद्वीपांच्या ठिकाणी नेहमीच भाषांची बहुलता राहिलेली आहे. पाश्चिमात्यांच्या वसाहतींपूर्वीही भारतातील विभिन्न राज्यांत समृद्ध व्यापार आणि सांस्कृतिक आदानप्रदान चालत असत. त्यामूळे भारतामध्ये केवळ द्विभाषीच नव्हे तर, प्रायः लोक बहूभाषी असत व असतात. याविषयक थोडा विस्तार असा की, आपण आपली मातृभाषा जाणतो, ज्या राज्यात आपण राहतो त्या राज्याची भाषा आपणास येते, आपल्याला इंग्रजी येते आणि सहजच आपण भारतातील इतर राज्यांतील भाषांसही जाणू शकतो. तसं पाहिलं तर भारतामध्ये आपल्याकडे संस्कृत आणि तमिळ यांसारख्या शास्त्रीय भाषा आहेत. तसेच आपल्याकडे गोंडी, लम्बाडी(लम्हाणी) यांसारख्या अत्यन्त प्राचीन जनजातीय भाषा आहेत. उत्तरपूर्वेस आपल्या कित्येक भाषा आहेत. काही वेळा आपण नवीन भाषा ही बनवल्या आहेत. नागालँडमध्ये एवढ्या संवादासाठी क्रेयल-भाषा नागामी ही बनवलेली होती. याप्रमाणेच उडिसामध्ये व्यवहारासाठी देसीया ही भाषा आहे, कारण त्याठिकाणी अनेक जमाती व त्यांच्या विभिन्न भाषा आहेत. 

परिणामी, आपण हा विषय (Multilingualism) अत्यन्त सामान्यपणे घेतो किंवा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. भारतामध्ये सञ्ज्ञात्मक-मनोविज्ञानामध्ये संशोधनाचा विषय अशी फारशी किंमत ही त्यास देत नाही. पण हे बदलावयास हवे. आणि हे हळूहळू बदलतही आहे. आपल्याला भारतामध्ये असे सञ्ज्ञात्मक-मनोविज्ञान शिकवावयास हवे की, ज्यात या भहूभाषीय सञ्ज्ञेचा अन्तर्भाव होतो व कश्याप्रकारे हे भाषास्थित अनुभूतीस सकारात्मकरूपाने प्रभावित करते.

यूरो-अमेरिकीय संदर्भामध्ये काही शोधांनी याचे अनेक लाभ दाखवून दिले आहेत. यामध्ये संशोधकांच्या मतानुसार अत्यन्त महत्वाचा लाभ असा की, एकाच अवधारणेस दिलेली वेगळी वेगळी नावे, आणि त्या विविधशब्दांच्या पलिकडे तद्बोधित विविध सङ्कल्पनांचे एकीकृत अवगमन. याचा मनाच्या जडणघडणीवर एक अत्यन्त खोल परिणाम झालेला असतो. उदाहरणादाखल इंग्रजी मधील ‘गॉड’ हा शब्द घेऊयात. उर्दुमध्ये यास ‘खुदा’ हा शब्द प्रयुक्त आहे तर हिन्दिमध्ये ‘ईश्वर’ किंवा दुसरा शब्द ‘प्रभू’/’विभू’. शब्दांपलिकडे असणारी अवधारणेची सङ्कल्पना, ही सङ्कल्पना व्यक्त करण्यासाठी शब्द वापरले गेले आहेत. संशोधनामध्ये आढळून आले की, द्विभाषी अथवा बहुभाषी व्यक्तीं हे समजण्यास सक्षम आहेत की अवधारणेचे प्रतिनिधित्व करणारे शब्द हे काहिसे अनियत आहेत, तर अवधारणा मात्र एकच आहे. यासच “meta-linguistic insight” असे म्हणतात. इथे एक लक्षात घेण्यासारखे आहे की संस्कृत भाषेतील शब्द आणि अवधारणा यांत स्वैराचार नाहीये.

संशोधनामध्ये हेही आढळून आले की, द्विभाषी मुले ही अवधारणानिर्मिती आणि तत्सम्बन्धी दृश्य सङ्कल्पनेच्या पुनःसङ्घटनेमध्ये सरस आहेत. तसेच हेही आढळून आले की ही मुले भाषेच्या अत्यन्त सूक्ष्म अंशापर्यन्त पोहोचतात व आपल्या भाषेच्या उपयोगामध्ये अत्यन्त संवेदनशील आणि व्यावहारिक असतात. याबाबतीत आपण रूपकांच्या समृद्ध भावना आणि भाषांमध्ये अवधारणांच्या संमिश्रणाच्यारूपात अन्य लाभांबद्दलही अनुमान करू शकतो.

तर मग, द्विभाषिकतेमध्ये काहि अडचणी नाहीत का? काही संशोधने म्हणतात की, जेव्हा दोन भाषा एकाच वेळी शिकल्या जातात तेव्हा व्याकरणाच्या अवगमनामध्ये थोडा अवधी लागू शकतो. अन्यबाबतींत, दुसरी भाषा बोलत असताना तीच्या ध्वन्यात्मकतेमध्ये अथवा उच्चरणामध्ये अडचणीं येऊ शकतात.

बहुभाषिकतेच्या अन्य लाभांस बघता या अडचणी नगण्य दिसतात. या संशोधित सिद्धांतांचा अवलंब करून बहुभाषी-शिक्षाप्रणाली शाळांमध्ये राबवू शकतो व आपल्या उच्चशिक्षाप्रणालिमध्ये देखील दोन किंवा अधिक भाषांचा उपयोग सुरू ठेऊ शकतो. सामन्यपणे उच्चशिक्षणस्तरावरती भाषाशिक्षण लुप्तच होते, विशेषतः विज्ञान व वाणिज्य शाखांमध्ये केवळ इंग्रजी भाषेचा उपयोग केला जातो. जगभरामध्ये सध्या उच्चशिक्षणाच्या अध्ययन अध्यापनामध्ये अन्तरानुशासिकतेच्या वाढिसाठी प्रयत्न चालला आहे, आणि कलाशाखेतील विषयांच्या समावेशाच्या सन्दर्भातही ऐकण्यास मिळत आहे. भारतातील विविध भाषा, जसे की ‘गोंडी’, ‘लंबाडी’(लम्हाणी), ‘लोथा’ किंवा ‘अंगामी’ समजून घेणे व त्यांचा अवलम्ब करणे, त्यांना निवडणारांसाठी उच्चशिक्षणाचा एक भाग होऊ शकतो. 

व्यावहारिकतया पाहिले असता, या शोधाध्ययनांचा भारताच्या भाषाविषयक धोरणांमध्ये चांगलाच प्रभाव पडू शकतो. शास्त्रीय व कार्यालयीन भाषा निर्धारित करणे, “साहित्य – अकादमी” स्थापन करणे यांव्यतिरिक्तही भाषा आणि साहित्यांस प्रोत्साहन देण्यासाठी आणखी व्यापक भूमिका सरकारकडून पार पाडल्या जाव्यात अश्या आहेत. जर आपण सम्पूर्ण शैक्षणिक कालावधीमध्ये बहुभाषीय शिक्षणाचे प्रमाणसिद्ध मूल्यांकन करू शकत असू तर आपण बहुभाषीय शिक्षणासाठी जोर देऊ शकतो यात काही शङ्का नाही. यासाठी सर्व भाषांतील सर्व विद्वानांस व भाषाप्रेमींस एकत्र यावे लागेल. कलाशाखेतील संशोधक, सञ्ज्ञात्मक-मनोविज्ञान आणि भाषाविदांस एकत्र येऊन संशोधन करण्याची व बहुभाषीय-शिक्षाप्रणालिबद्दल प्रमाणसिद्ध पुरावे निर्माण करण्याची गरज आहे.

भारतामध्ये सञ्ज्ञात्मक-मनोविज्ञानामध्ये आजही आपण तितकेसे दक्ष प्रतीत होत नाही. संशोधनाचे धोरण ही स्पष्टपणे सीमित आहे. सध्याच्या ढासळत चाललेल्या शैक्षणिक स्थितिवरील संशोधन आपल्याला बहुभाषा शिक्षणासाठी वाञ्छित प्रमाणांच्या प्राप्तीस नक्कीच कारण ठरू शकेल. बहुभाषा शिक्षण हे भारतीयभाषांमध्ये नवनवीन सङ्कल्पना अवधारणा आणि शब्दसमृद्धिच्या निर्मितीस कारण ठरू शकेल. आपण संस्कृतसह इतर भाषांमध्येदेखील ग्रन्थनिर्मिती व अन्य साहित्य निर्मिती करू शकू. 

दार्शनिकांमध्ये देखिल भाषा व विचार यांच्या सम्बन्धाबद्दलचा प्रश्न, हा दिर्घकाळ संशोधनाचा विषय राहिलेला आहे. ‘Wittgenstein’ यांनी देखिल एका ठिकाणी म्हटले आहे, “माझ्या भाषेच्या सीमा या माझ्या जगतानुभवाच्या सीमा आहेत”. सर्व अनुभव हे भाषास्थितच असतात का? अनुभव हा भाषेपलीकडे जाऊ शकत नाही का? भाषेपलीकडे असलेल्याला अनुभव म्हणता येऊ शकत नाही का? विचार हा भाषेपलीकडे नसू शकतो का? हे यासन्दर्भातील काही महत्वाचे प्रश्न आहेत.

अन्ततः मी आपल्याशी काही स्नातकोत्तर-विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रियांबद्दल बोलू इच्छिते, ज्या मला त्यंच्याशी सञ्ज्ञात्मक-मनोविज्ञानाच्या वर्गामध्ये या द्विभाषा विषयाबद्दल बोलल्यावर मिळाल्या होत्या. बहूतेक विद्यार्थ्यांनी देवनागरी लिपिसह संस्कृत शिकण्याची इच्छा व्यक्त केली. काहिंसाठी हे जरा कठीण होत. एक नवीन भाषा शिकणे म्हणजे, एक नवीन प्रतीकांचा सञ्च शिकण्या सारखे आह. अर्थातच अन्ततोगत्वा याबरोबरच एक ध्वनींचा व उच्चरांचा एक नवीन सञ्च ही तितकाच महत्वाचा. परीणामी द्विभाषी अथवा बहुभाषी व्यक्ती या कूटसङ्केतांस वेळोवेळी आपल्या इच्छेनुसार बदलणे, हे आधिक्याने शिकतात. त्यामुळे माझ्या विद्यार्थ्यांस एक नवीन भाषा शिकण्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता आहे असे जाणवले. परंतु त्यांना त्या प्रयत्नांच्या लाभाची देखील जाणीव झाली.

वर्तमानात आपण मराठिभाषेच्या प्रासङ्गीकतेला सांस्कृतिक, तान्त्रिक व शैक्षणिक विमर्शांमध्ये राखण्यासाठी झटत आहोत. इंग्रजिच्या मगरमिठितून सुटण्यासाठी बहुभाषाशिक्षणासम्बन्धित संशोधनांच्या प्रमाणांस जस्तित जास्त पसरविणे अत्यावश्यक आहे. भारतीय संस्कृती ही श्रुती, स्मृती व वाणी यांवरती आधारलेली आहे. वाणी जरी सूक्ष्म; भाषेहून सूक्ष्म असली तरी व्यावहारिक पातळीवरती भाषा ही वाणीचे प्रतिनिधित्व करते. अश्या प्रकारे आपण जेव्हा भाषेसम्बन्धी काही संशोधन करतो तेव्हा भारतीची उपासनाच करतो.

Article by: Dr. Shilpa Pandit, Associate Professor, School of Philosophy, Psychology & Scientific Heritage

Translated by: CVV students Amol Jadhav, Avinash Chavhan, Narayan Shete

Spread the love

Chinmaya Vishwa Vidyapeeth

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *